Thursday, 19 May 2011

नाही ... नाही.... नाही ......


नाही ... नाही.... नाही ......

नाही ... नाही.... नाही

एकदा एक राजा शिकारीसाठी जंगलात गेला होता. त्याने जंगलात धनुष्यबाण मारुन एका सिंहाची शिकार केली. पण धनुष्यबाण लागल्यानंतर मरण्याच्या आधी सिंह खुप तडफडला आणि त्याने खुप डरकाळ्या सुध्दा फोडल्या. त्यामुळे तिथे ध्यानस्थ बसलेल्या एका ऋषीची तपश्चर्या भंग झाली आणि त्याने रागाच्या भरात त्या राजाला शाप दिला. की तुझी उंची 25 फुट होवो की जेणेकरुन कोणत्याही प्राण्याची शिकार करण्याच्या आधी त्याला तुझी चाहूल लागून तो सावध होवो. रागाच्या भरात तर ऋषीने शाप दिला पण त्यामुळे राजाची उंची एवढी वाढली की त्याला कुठेही वावर करणे एकदम कठीण होवून बसले. म्हणून राजाने गयावया करुन त्या ऋषीची माफी मागीतली आणि त्याला त्याची उंची पुर्ववत करण्यास विनविले. राजाने बराच आग्रह आणि विनवणी केल्यामुळे ऋषीचा राग कमी होवून राजाला त्याचे त्याची उंची पुर्ववत करण्याचा एक उपाय सांगितला -

'' इथून पुढे 15 किमी अंतरावर जंगलाच्या आत एक वेडी बाई राहाते ... तु तिचा शोध घे आणि तिला असा प्रश्न विचार की तिने त्याचे उत्तर 'नाहॊ' असे दिले पाहिजे... तू तिला कितीही प्रश्न विचार आणि तिने जितके वेळा 'नाही' असे म्हटले तितके वेळा तुझी उंची 5 फुटाने कमी होईल.''

राजाने तिथून पुढे 15 किमी जंग जंग पछाडून त्या वेड्या बाईचा शोध लावला आणि त्या ऋषीने सांगितल्या प्रमाणे त्या बाईला वेगवेगळे प्रश्न विचारायला सुरवात केली.

'' तुला फाशी देवू का?''

'' हो''

'' तुला जंगलातून काढून देवू?''

'' हो''

राजाने तिला कितीतरी प्रश्न विचारुन हैरान केले पण तिचे उत्तर 'हो' असेच मिळत असे.

शेवटी राजाने चिडून तिला प्रश्न विचारला - '' तू पागल आहेस का?''

तिने पटकन उत्तर दिले - '' नाही''

आणि काय आश्चर्य राजाची उंची ताबडतोब पाच फुटाने कमी झाली.

राजाची उंची आता 20 फुट झाली होती. 20 फुट उंचीही खूप जास्त होती म्हणून राजाने तिला पुन्हा तोच प्रश्न विचारला -

'' तू पागल आहेस का?''

तिने पुन्हा उत्तर दिले '' नाही''

राजाची उंची पुन्हा 5 फुटाने कमी होवून राजा आता 15 फुटाचा झाला होता. 15 फुटही जास्तच होते म्हणून राजाने पुन्हा त्या वेडीला विचारले - '' तू पागल आहेस का?''

ती वेडी चिडून म्हणाली, '' तुला किती वेळ सांगायचं, नाही, नाही, नाही''

आम्ही आणि क्रेडिट कार्ड वाली कन्या!!


( मराठीऑनलाइन मधून साभार)
आपण कुठल्या ना कुठल्या कामात असताना ह्या क्रेडिट कार्ड वाल्यांचा फोन येत नाही असे होत नाही. आधि मला सुध्दा संताप यायचा पण मग आता आम्ही ह्याचा आनंद घ्यायला शिकलो आहे, आणी आता तर आमची खात्रीच झाली आहे कि हे फोन आम्हाला तणावमुक्त करण्यासाठीच येतात. आपल्यालाहि ह्यातुन काही फायदा व्हावा ह्या सदहेतुने आमचे संभाषण येथे देत आहोत. (ह्यात कोणालाहि दुखवायचा हेतु नाही.)
वेळ :- दुपारी २.१५ (गरगरित जेवण करुन नुकतेच आडवे झालो आहोत)
कन्या :- गुड आफ्टरनून सर, आय एम कॉलींग फ्रॉम दरोडा बॅंक.
आम्ही :- जय महाराष्ट्र ! (पहिल्याच चेंडुवर षटकार)
कन्या :- नमस्ते सर, मी दरोडा बॅंकेमधुन बोलतीये, आम्ही एक नविन क्रेडिट कार्ड
लॉंच करतोय त्या विषयी माहिति द्यायला हा फोन केला होता सर. तुम्ही इंट्रेस्टेड
आहात का सर ?
आम्ही :- कोणाच्यात ?
कन्या :- सर कार्डमध्ये हो
आम्ही :- ओह्ह अच्छा , काय आहे ना कि आयुष्यात पहिल्यांदा कोणीतरी येवढ्या गोड
आवाजात इंट्रेस्टेड आहात का ? असे विचारले हो, त्यामुळे जरा गोंधळ उडाला बघा.
कन्या :- (मनातल्या मनात खुश झाली असावी) मग सर तुम्हाला कधि वेळ आहे ?
आम्ही :- अहो तुमच्या साठी वेळच वेळ आहे आमच्याकडे !
कन्या :- तसे नाही सर, ह्या कार्ड विषयी माहिती देण्यासाठी.
आम्ही :- अहो असे मला गोंधळवु नका हो, एक तर सुंदर मुलीशी बोलायचे म्हणजे आमची
आधिच वाचा बसते. मला सांगा तुमच्याच कार्डची माहिती मी तुम्हाला कशी आणी का
द्यायची ?
कन्या :- (डबल खुश होत ) अय्या अहो सर म्हणजे तुम्हाला कधी वेळ आहे ? आमचा
प्रतिनिधी येउन तुम्हाला पुर्ण माहिती देइल.
आम्ही :- एक प्रश्न विचारतो रागवु नका, तुमचे नाव मंजिरी आहे का हो ? आणी
तुम्ही अहिल्यादेवी शाळेत होता का ?
कन्या :- नाही ! आपण कार्ड विषयी बोलुयात का ?
आम्ही :- बघा रागवलात ना तुम्ही ? आहो एक खुप चांगली मैत्रिण होती हो माझी ह्या
नावाची, अगदी असाच गोड आवाज आणी असेच जड जड मराठी शब्द वापरायची सवय होती हो
तिला. तुमचा आवाज ऐकला आणी तिच आठवली बघा पटकन, माफ़ करा मला. म्हणतात ना आपली
दुख: हि लोकासाठी विनोद असतात तेच खरे.
कन्या :- (भावुक स्वरात) नाही रागावले नाही सर. कुठे असतात त्या आता ? त्या पण
बॅंकेत असतात का ?
आम्ही :- नाही हो, लहानपणीचा ताटातुट झाली आमची, कुठे आहे काय करते … काही
काही माहीत नाही हो. (आम्ही जमेल तेव्हड्या दु:खी सुरात)
कन्या :- (चिकाटी न सोडता) ओह, सो सॉरी सर. आज वेळ काढु शकाल का सर तुम्ही ?
आम्ही :- हो जरूर, तुम्हाला भेटुन आनंदच होइल मला. पुन्हा त्या जुन्या आठवणी
ताज्या होतील आणी मग आज तरी निदान दारू ची गरज लागणार नाही मला… (फुल्ल टु
देवदास इस्टायील)
कन्या :- सर, मला भेटुन ? आमचा त्या भागातला एजंट येउन भेटेल सर तुम्हाला. मी
नाही. (हळु हळु कन्या त्रासीक स्वरात बोलायला लागली आहे.)
आम्ही :- अरे असे कसे ? फोन करणार तुम्ही, वेळ देणार आम्ही तुम्हाला, आणी तो का
भेटायला येणार ? मेहनत करे मुर्गा आपले मुर्गी आणी अंडा खाये फकीर ?
कन्या :- (प्रचंड नाराजीने) सर, आम्ही फक्त कॉल सेंटर साठी काम करतो. लोकांना
भेटण्यासाठी वेगळी माणसे नेमली आहेत.
आम्ही :- अच्छा म्हणजे फोनवर टोप्या घालणारी आणी प्रत्यक्षात टोप्या घालणारी
वेगवेगळी माणसे आहेत तर !!
कन्या :- पार्डन सर ?? (आतुन संतापाचे स्फोट होत असावेत त्यामुळे कन्या परत
इंग्लिश वर घसरली आहे)
आम्ही :- नाही म्हणजे तुमच्या भेटिचा योग नाहीच म्हणा की, काये मन कसे वेडे
असते बघा, लगेच तुमच्या भेटीची स्वप्न रंगवुन तय्यार. लबाड कुठले !
कन्या :- सर सध्या तुम्ही कुठले कार्ड वापरत आहात ?
आम्ही :- नेटवाला.कॉम चे. पण ४ वर्ष झाली अजुन कसे आणी कुठे वापरायचे ते कळाले
नाहिये.
कन्या :- सर, मी क्रेडिट कार्ड बद्दल बोलत आहे.
आम्ही :- हो, ते तुम्ही फोन उचलल्या उचलल्या सांगीतलेत की !
कन्या :- सर, आय मिन सध्या तुम्ही कुठले क्रेडिट कार्ड वापरता ?
आम्ही :- अहो रेशन कार्ड नाहिये माझ्याकडे अजुन, क्रेडिट कार्ड बद्दल काय
विचारताय ? पण खरच आपण नाहि का हो भेटु शकणार ? अगदी तुमच्या सोयीच्या वेळी.
कन्या :- सर तुम्हाला कार्ड हवे आहे का ? मला बाकीच्या ग्राहकांना सुध्दा फोन
करायचे आहेत. प्लिज कार्ड विषयी बोला.
आम्ही :- तुम्ही तुमचे काम उरकुन घ्या ना निवांत. माझा नंबर तर आहेच तुमच्याकडे,
संध्याकाळी तुम्ही मोकळ्या झाल्यात की मग एक मिस कॉल द्या, मी करतो तुम्हाला
फोन.
(पलिकडुन असभ्य काहितरी पुटपुटल्याचे ऐकु येउन खाडकन फोन आदळला जातो.)

बालगंधर्व ::असा बालगंधर्व आता न होणे ::

नारायण श्रीपाद राजहंस यांचा जन्म २६ जून १८८८ रोजी सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यात नागठाणे या गावी झाला.बालगंधर्व पं भास्करबुवा बखले यांचे शिष्य आणि मास्तर कृष्णरावांचे गुरुबंधू होत.कारकीर्दीच्या सुरूवातीच्या काळात त्यांचे गाणे ऐकून लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी त्यांना बालगंधर्व ही पदवी बहाल केली. पुढे ते त्याच नावाने लोकप्रिय झाले.
रंगभूमीवर स्त्रिया अपवादानेच अभिनय करीत असतानाच्या काळात आपल्या हुबेहुब रंगवलेल्या स्त्री-भूमिकांमुळे बालगंधर्वांनी मोठी लोकप्रियता मिळवली
बालगंधर्वांची रंगभूमीवरील कारकीर्द किर्लोस्कर संगीत मंडळी या नाट्यसंस्थेत १९०५ मध्ये झाली. मात्र तिचे एक भागीदार नानासाहेब जोगळेकर यांच्या १९११ मध्ये निधनानंतर संस्थेत वाद झाले. परिणामी १९१३ मध्ये बालगंधर्वांनी, गणेश गोविंद (गणपतराव) बोडस आणि गोविंदराव टेंबे यांच्यासह ती संस्था सोडली आणि गंधर्व संगीत मंडळीची स्थापना केली. मात्र १९२१ मध्ये कर्जात अडकलेल्या या नव्या कंपनीचे नारायणराव राजहंस हे एकमेव मालक होते. त्यानंतर त्यांच्या नाटकांनी मिळवलेल्या लोकप्रियतेच्या जोरावर त्यापुढच्या सात वर्षांत कंपनीने सर्व देणी फेडली. मात्र त्यापुढच्या काळात या संस्थेची आर्थिक स्थिती चढउताराचीच राहिली. नाटकाच्या प्रॉपर्टीसह अनेक गोष्टींमध्ये दर्जा आणि अस्सलपणा राखण्याचा बालगंधर्वांचा आग्रह हेही त्याचे एक कारण सांगितले जाते. प्रभात फिल्म कंपनीसाठी बालगंधर्वांनी ‘धर्मात्मा’ चित्रपटात संत एकनाथांची भूमिकाही केली.
बालगंधर्वानी आपल्या भूमिका साकारनाच संगीत नाटक आणि नाट्यसंगीत हे कलाप्रकार मध्यमवर्गीय महाराष्ट्रीय कुटुंबांमध्ये लोकप्रिय केले. नाटककार अण्णासाहेब किर्लोस्कर, गोविंद बल्लाळ देवल, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, काकासाहेब खाडिलकर, राम गणेश गडकरी आणि वसंत शांताराम देसाई प्रभृतींनी लिहीलेली अनेक संगीत नाटके बालगंधर्वांनी केली.
भाऊराव कोल्हटकरांच्या १९०१ मधील निधनानंतर जेंव्हा संगीत नाटक परंपरेला उतरती कळा आली, त्यानंतर बालगंधर्वांनी या परंपरेत मोलाची भर घालत ती पुढे नेण्याचे महत्वाचे कार्य केले. १९२९ सालच्या २४ व्या मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते.
स्त्री भूमिकांसाठी महिला कलाकारांची गरज निर्माण झाल्यानंतर एप्रिल १९३८ मध्ये गोहर कर्नाटकी यांचा गंधर्व नाटक मंडळीत समावेश झाला. १९४० मध्ये नारायणरावांच्या पत्नीचा मृत्यू झाला. गोहरबाईंनी त्यानंतर कंपनीचा कारभार सांभाळण्यातही सहभाग दिला. १९५१ मध्ये नारायणरावांनी गोहरबाईंशी कायदेशीर रीतीने विवाह केला.
त्यांनी संगीत सौभद्र, मृच्छकटिक, शाकुंतल, मानापमान, संशयकल्लोळ, शारदा, मूकनायक, स्वयंवर, विद्याहरण, एकच प्याला सह एकूण २५ विविध नाटकांत भूमिका केल्या. त्यांची संगीत शाकुंतल नाटकातील ‘शकुंतला’ व मानापमान नाटकातील ‘भामिनी’ या भूमिकांमुळे एक प्रतिभावंत कलाकार म्हणून त्यांचे नाव सर्वत्र झाले. १९५५ रोजी त्यांनी एकच प्याला नाटकात साकार केलेली सिंधू ही त्यांची शेवटची भूमिका ठरली. त्यानंतर त्यांनी रंगभूमीवरून निवृत्ती घेतली.
  • बालगंधर्वांचा संगीत १९५५ साली संगीत नाटक अकादमीने राष्ट्रपती पदक देऊन सन्मान केला.
  • भारत सरकारनी बालगंधर्वाना १९६४ साली पद्मभूषण ह्या पुरस्काराने गौरविले

लक्षात राहिलेला टाय डे

आमच्या कॉलेज मध्ये एकदा टाय डे होता आमच्या वर्गातली सगळी मुले त्यादिवशी टाय घालून आली होती आणि मी हि अगदी टाय मस्त पैकी कपडे घातले होते आणि सर आमच्या वर्गात आले आल्या आल्या आम्हा सगळ्या मुलांचा कौतुक केला तास संपेपर्यंत वेळ गेला आणि जाताना आम्हाला सांगून गेले कि " मुलांनो आज टाय घातली ठीक आहे पण आयुष्यात टाय तेव्हाच घाला जेव्हा तुम्ही त्या लायकीचे बनाल " तेव्हा अगदी सगळ्यांची तोंड बघण्यासारखी झाली होती अगदी वर्गातल्या हुशार मुल्लांपासून ते आमच्यासारख्यांची तोंड बघण्यासारखी मी तेव्हा पासून आजपर्यंत कधीच टाय घातली नाही जेव्हापण टाय घातलेला  कोणी दिसतो तेव्हा मला पण लगेच आमच्या सरांचा चेहरा आठवतो मी आज जिथे कामाला आहे तिथे माझ्या ड्रेस सोबत मला टाय आहे पण गेल्या वर्षाबारापासून मी कधीच टाय  कारण मी स्वताला त्या लायकीचा कधीच समाजाला नाही म्हणूनच मला टाय असूनही मी तो ६-७ महिन्यापासून मी तो घातलेला नाही कारण मला माहित आहे कि मी आजून पर्यंत त्या लायकीचा नाही कि मी टाय घालून मिरवू शकेल 

बायकोबरोबरची खरेदी


 बायकोबरोबर खरेदीला निघालेल्या नवर्‍याचा आणि वधस्तंभाकडे नेलेल्या वसंतसेनाघातकी चारुदत्तचा अभिनय सारखाच असतो. तीच हतबलता, तीच चिंता काही फरक नाही. बायकांना ज्या काही गोष्टी फक्त स्वता:लाच उत्तम जमतात असं वाटतं त्यातली खरेदी ही महत्वाची बाब आहे. दोन पैशाचा अळू असो, नाहीतर दोनशे रुपयांचा शालू असो, दक्षता तीच, जिकर तीच, हुज्जत तीच किंबहुना दुकानदाराशी हुज्जत घालायची पराकाष्ठेची तयारी हा तर खरेदीशास्त्राचा पाया आहे. तुम्हाला जर बायकोबरोबर खरेदीला जायचं असेल देव करो आणि असले प्रसंग फारसे तुमच्यावर न येवोत. तर एक गोष्ट प्रथम लक्षात घेतली पाहिजे. "लवकर आटपा" हे वाक्य चुकूनसुद्धा उच्चारता कामा नये. राग, लोभ, क्रोध वगैरे जिंकायची योगसाधना संसारात राहून देखील करायची असेल तर बायकोबरोबर खरेदीला जावं.

सुरुवातीच्या हौसेच्या काळात माळ्याचा दुकानात वेळी विकत घेऊन देण्यापासून ह्या खरेदीला सुरुवात होते. फुलं निष्पाप असतात पण वेण्या ही गोष्ट भयंकर आहे. खरेदी नावाच्या गोष्टीतला खरी झळ तिथं बसायला लागते. आपण आपले मोहून जातो- त्या नाना प्रकारच्या वेण्या, वेण्यांची ती वेण्यांहुनही मोहक गिर्‍हाइकं वगैरे पाहून...हो.. आपल्या आपल्यात खोट कशाला बोला? पण पहिले चटके इथेच बसतात. मला तर टोपलीतली प्रत्येक वेणी चांगलीच दिसते. सुरवातीला मीदेखील हिच्यापुढे जातीच्या सुंदरीना काहीही शोभतं वगैरे विनोद करत असे. पण पुढे पुढे ह्या सुंदरीनं जात दाखवायला सुरुवात केली. नुसती चार सहा आण्यांची वेळी तास तास खायला लागली. पुरुषांना आवडलेल्या वेणीचं सौंदर्य बायकांच्या डोक्यात शिरत नाही. आपल्याला शेवंतीची वेणी आवडली तर बायको अबोलीसाठी डोकं धरुन बसते. एका अबोलीच्या वेणीसाठी हिच्याबरोबर मी ठाकूरद्वारपासुन बेनाम हॉल लेनपर्यंत तीन चकरा मारल्या आहेत. वाटेतल्या कुलकर्ण्याच्या हॉटेलातली भजी हाक मारून बोलवत असतात पण काही नाही- अबोली! शेवटी एकदाची दोन देऊळाजवळ अबोली सापडली. मी हुश्श करणार इतक्यात ही म्हणाली "त्यापेक्षा ठाकूरद्वारच्या दुकातली चमेलीच ताजी होती. मी बसते दोन देवळांत घटकाभर. लक्षात आलं ना कुठली ती?" लगेच घूम जाव करुन ठाकूरद्वार गाठावं लागलं.

पण ह्या सगळ्या प्रकरणांत सर्वात गंभीर मामला म्हणजे कापडखरेदी! बाप रे! आमची बायको एके दिवशी म्हसकरांच्या दुकानतल्या लोकांसमोर चक्क मला चिकन घ्यायचयं म्हणाली. चिकन? पोबृंप्याच्या मारूतीच्या देवळातल्या उपाध्यांच्या घरात बटाटाच्या सुक्या भाजीला पक्वान माणणार्‍या कुटुंबात वाडलेली बगंभटाची ही अन्नपुर्णा ’चिकन’ मागायला लागल्यावर मी आधी सोडा मागवला. घरात अजून अंड्याचा पत्ता नव्हता आणि चिकन? कडमड्याच्या पोष्ट्या जोश्याची सुन आणि बेबंट्याची बायको चिकन खाते हे कळल्यावर सारा रत्नागिरी जिल्हा हादरला असता. मी जोरात ओरडलो "चिकन?" म्हसकरांच्या दुकानाला मटणप्लेट हाऊस समजलीस की काय ही? मला वाटलं आता म्हसकर कापडवाले मृच्छित पडणार. पण घटकाभरात चिकन हे कापडाचं नाव आहे हे कळलं. म्हसकरांच्या दुकानात त्या दिवशी एक इसम थंड सोडा पितांना पाहिला का कुणी? मीच तो! तशीच एकदा मटणकट म्हणाली. मटणकट ही एके काळी पोलक्याची फॅशन होती. हळूहळू मी ही निर्ढावत चाललोय. उद्या हिने दुकानात जाऊन ’बोकड’ मागितला तरी मी बोलणार नाही. आता चिकन हे पोलक्याच्या कापडाचं नाव असल्यावर बोकड हे शर्टिंगच नाव असायला काय हरकत आहे? एकदा आमच्या शंकर्‍याला लग्नमुंजीला जातांना घालायला चांगलासा शर्ट शिवायचा म्हणून अठवले शहाड्यांकडे कापड घ्यायला गेलो. तिथल्या एका पोक्त माणसाला हिने विचारलं "डब्बल घोडा आहे का हो?"
"अग शंकर्‍याच्या मुंजीचा अजून पत्ता नाही आणि वरातीच्या घोड्याची कसली चौकशी करतेस? असं म्हणून मी त्या पोक्त गृहस्थांना म्हणालो "माफ करा बरं का अठवले!" त्यांनी पाहिलच नाही, ते शहाडे असतील म्हणुन मी गप्प बसलो. पण ते मात्र म्हणाले "गोवींदा, डबल घोडा घे"
मग तो गोंवीदा रेशमी कापडाचं ठाण घेऊन आला. "अस्सल डबल घोडा आहे" ते म्हणाले. त्यांनी किंमत सांगितल्यावर मात्र त्यापेक्षा खर्‍या घोड्याची जोडी स्वस्तात मिळेल असं मला वाटलं. मी त्यांना म्हणालो "अहो शहाडे, लहान मुलाच्या शर्टाला हवयं कापड, त्याला करायचाय काय डबल घोडा? चांगलासा मांजरपाट काढा!"
"तुम्ही गप्प बसा बघू! डबल घोडाच फाडा हो दोन बार त्यांच काय ऎकता तुम्ही कुलकर्णी?"
हात्तिच्या, म्हणजे ते अठवले पण नव्हते, शहाडे पण नव्हते. आणि मंडळीपैकी होते, त्यांनी रीतसर डबल घोडा फाडायला सुरुवात केली आणि मी तिसरीकडेच पाहायला लागलो.

ह्या कापडखरेदीत लुगड्याचा पोत, काठ, पदर, रंग वगैरे बाबतीत जो आपला सल्ला घेण्यात येतो, तो स्विकारण्यासाठी नसतो हे ध्यानात ठेवले पाहिजे. एकदा मी असाच हिच्या बरोबर कापडखरेदीला गेलो होतो. हिनं नेहमीप्रमाणे ते हे काढा हो, ते ते काढा हो, चाललं होतं. मी थोडासा इतर गिर्‍हाइकांकडे पाहण्यात गुंतलो होतो. तेवढ्यात ही म्हणाली, "कसं आहे हो अंग?"
"गोरं?" असं म्हणून ही एवढ्यांदा ओरडली की ज्या गोर्‍या अंगाकडे पहात होतो ते देखील दचकलं. लुगडं हे अंग झाकण्यासाठी असतं अशी माझी समजूत. आता लुगड्य़ालाही अंग असतं हे मला काय ठाऊक.

नागपूर, महेश्वर, इरकाल, इचलकरंजी, कांजीवरम, बनारस ही गावं पुरुषांचा सुड घेण्यासाठी स्थापन झालेली आहेत. एकदा मला ही अशीच म्हणाली होती "हा पडवळी रस्ता बरा आहे की वैंगणीच घेऊ?" मला आधी हा रास्ता कोण हे एक ठाऊक नव्हतं पण पडवळ ही गोष्ट नावडती असल्यामुळं "हा वैंगणीच बरा दिसतोय" म्हणून मी एका लुगड्यावर हात ठेवला.
"इश्श, अहो हाच तर पडवळी आहे!"
लगेच मी चलाखी करुन म्हटलं, "अग, तो नको म्हणून मी त्याच्यावर हात ठेवला. तो वैंगणी हे तर मोरपंखी आहे. त्यांच्या कडची वैंगणी संपली आहेत."
निमूटपणं मी तिच्या मागे वैंगणीच्या शोधात निघालो.
असले हेलपाटे खाल्ल्यापासून मी कापडखरेदीला गेल्यावर कुठल्याही पातळाबाबत तिनं आपलं मत विचारलं की उगीचच विचारात पडल्यासारखा दाखवतो. कपाळाला काही आठया घालता आल्या तर घालतो. अधूनमधून नाक खाजवतो. उगीचच "हं ~~~" असा सुस्कारा सोडतो. याचा अर्ध पसंत किंवा नापसंत काहीही होऊ शकतो. कोणतीही सुचना स्पष्टपणे करायची नाही.

कापडदुकानातले नोकरलोक हे गेल्या जन्मीचे योगी असतात अशी ठाम श्रद्धा आहे. बनारसी शालू आणि राजापुरी पंचा एकाच निर्विकार मनानं दाखवतात. कसलाही आग्रह नाही. लुगड्यांच्या शेकडो घड्या मोडतात पण चेहर्‍यावरची घडी मोडू देत नाहीत. बायका काय वाटेल ते बोलतात. "शी! कसले हो हे भडक रंग!" लुगड्याच्या दुकानातील माणूस संसारात असून नसल्यासारखा चेहरा करून असतो. निष्काम, निरहंकारी चेहरा! समोरची बाई म्हणत असते "कसला हा भरभरी पोत" हा शांत. गिर्‍हाईक नऊवारी काकू असोत नाहीतर पाचवारी शकू असो ह्याच्या चेहर्‍यावर शुकासारखे पूर्ण वैराग्य असते. समोर शेपन्नास सांड्याचा ढिग पडलेला असतो पण एखाद्या चित्रकला प्रदर्शनातला मेणाचा माणूस बोलावा तसा अठरा रुपये, तेवीस बारा, बेचाशीस अश्या किमती हा गृहस्थ, "अथोक्षजाय नम: अच्युअताय नम: उपद्राय नम: नरसिंहाय नम: ह्या चालीवर सांगत असतो. सगळा ढिग पाहुन झाला तरी प्रश्न येतोच "ह्यातलं लेमन कलर नाही का हो एखादं?" एक वेळ तेराला तिनानं पूर्ण भाग जाईल पण लुगड्याची खरेदी आटोपली तरी एखाद्या प्रश्नाची बाकी उरतेच आपली स्वता:ची बायको असूनसुद्धा तिच्या चेंगटपणाची चीड येते. पण कापडदुकानातले ते योगीराज शांतपणं म्हणतात "नारायण, इचलकरंजी लेमन घे." माणसाला जर क्रोध जिंकायचा असेल तर त्यानं हिमालयात न जाता कापड्याच्या दुकानात नोकरी करावी.

हल्ली मला सवयीनं पुष्कळ गोष्टी कळायला लागल्या आहेत. हिला एखादं पातळ पसंद पडलं की नाही हे मी पातळापेक्षा हिच्या चेहर्‍याकडे बघुन सांगू शकतो. हवा तसा रंग, पदर, किनार हे त्रिकोणाचे तीन बिंदु कधीही जमत नाही. तो त्रिकोण जमला तर मॅचींग खण नसतो. एकतर अमूक एक रंगाचंच लुगडं घ्यायचं असा निर्धार करुन निघालेली बाई तेच लुगड घेऊन दुकातून बाहेर पडली हे दृष्य मला अजून दिसायचं आहे. आमची हीच काय पण "कोइमतुरीमध्ये काही आहे का हो?" असा पुकारा करत येणारी बाई हटकून कोइमतुरी सोडून दुसरचं घेऊन जात असते. पण त्यातल्या त्यात आमच्या हिला काही पडलंच पसंत तर तिच्या चेहर्‍यावर एक प्रकारची लकाकी येते. एखाद्या आवंढाबिवंढा गिळाल्यासारखं करते आणि हल्ली त्या वार्‍याबरोबर नाचणार्‍या बाव्हल्या मिळतात त्या, तशी एक दोनदा मान हलवून "हे लुगड जरा बाजूला ठेवून द्या बरं का" म्हणते. तेवढ्यात तिसरीच बाई दुसर्‍या योगीराजांना हैराण करत असते. कुटुंब त्या गठ्यात लक्ष घालतं आणि नेमकी त्या बाईने पसंत केलेलं लुगडं म्हणा, पातळ म्हणा, दंडीया म्हणा, काय असेल ते हिला पसंत पडतं. दंडीया हा जंबियासारखा सुर्‍याचा प्रकार आहे अशी माझी समजूत होती. पण तो ही लुगड्याचाच प्रकार आहे हे मला लग्नानंतर कळलं.

थोडक्यात म्हणजे बायकोबरोबर खरेदीला जातांना आपण लोकांच्या मुलांच्या वाढदिवसामुळं अगदी मनापासून आनंद झालेल इसम मला अजून भेटायचा आहे. तरीही आपण जातो कर्तव्य म्हणून. तीच गत पत्नीबरोबरच्या खरेदीची. इथं आनंद होण्यापेक्षा झाला आहे हे भासवण्याला अधिक किंमत आहे. मात्र एका गोष्टीला अजिबात भिऊ नये. पुष्कळदा आपल्याला वाटतं, कुटुंबाच्या चिकित्सक स्वभावामुळं दुकानदार चिडेल, भांडणतंटा होईल, पण दुकानदार चिडत नाही. कारण तोही बिचारा नवरा अस्तो. त्याची बायको देखील खरेदीला गेली त्याची हीच अवस्था करते. आणि नवर्‍याच्या दुकानातुन ती कधीही साड्या नेत नाही. तुम्ही कधी कापडवाल्याची बायको त्याच्या दुकानात खरेदीला आलेली पाहिली आहे? मी नाही पाहिली. आणि खरोखरच अमुक तमुक मंडळींची मंडळी आपल्या यजमानांच्या दुकानात आलीच खरेदीला, तर "तुमच्यापेक्षा लोकमान्यात कितीतरी व्हरायटी आहे" असं नवर्‍याचा तोंडावर सांगून लुगड़्यांच्या ढिगा खाली त्याला गाडून निघून जाईल. स्त्रिस्वभाव स्त्रिस्वभाव म्हणतात तो हाच, तो समजावून घेण्यात निम्मं आयुष्य निघून जातं.


Source: http://cooldeepak.blogspot.com/2010/08/blog-post.html